नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील हजारो नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन अखेरचा सलाम केला. तसेच त्यांना 300 जवानांनी मानवंदना दिली.
दरम्यान आज सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनी दिल्लीत उपस्थिती लावली होती. वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. त्यामुळे त्यांचं अखेर काल निधन झाले.
COMMENTS