‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना आव्हानात्मक उत्तर !

‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना आव्हानात्मक उत्तर !

मुंबई – शिवसेनेनं ऑडिओ क्लिपची मोडतोड करुन ती सादर केली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हानात्मक उत्तर दिलं आहे. आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना आमदार अनिल परब यांनी थेट आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तो आवाज त्यांचा असल्याचं मान्य केल्यामुळे सुदैव असल्याचंही परब यांनी म्हटलं आहे. ऑडिओ क्लिपमधील भाषा मुख्यमंत्र्यांना शोभनिय नाही. जर क्लिप तोडून मोडून दाखवली, असा त्यांचा दावा असेल तर त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे. या क्लिपबाबत आजच्या आज फैसला करण्यात यावा असंही परब यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्रीही आहेत. फॉरेन्सिक लॅब त्यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यांनी आयोगाला विनंती करावी की आजच्या आज निर्णय घ्यावा. तज्ज्ञ बोलवा, लोकप्रतिनिधी बोलवा. समोरासमोर तपासून घ्या की ही एडिटेड क्लिप आहे का ?आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

COMMENTS