औरंगाबाद – राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी संकटात आले आहेत. तर सरकारच्या अधिका-यांकडून पंचनामे करताना शेतक-यांची थट्टा केली जात असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादमधील वैजापूरमध्ये अधिका-यांनी चक्क घोड्यावर बसून कापसाची पाहणी केली आहे. बोंडअळीचा अहवाल सादर करण्यासाठी कमी कालावधी असल्यामुळे या अधिका-यांनी ही शक्कल लढवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान वैजापूरमधील शेतक-यांच्या कापसाची पाहणी करण्यासाठी आज अधिका-यांचं पथक गेलं होतं. या पथकातील काही अधिका-यांनी चक्क घोड्यावर बसून पंचनामे करत असल्याचं पहावयास मिळालं आहे. यामध्ये तलाठी पैठण पगारे आणि त्यांच्या सहका-यांनी ही शक्कल लढवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि या घोडेश्वार अधिका-यांवर शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. असे पंचनामे झाले तर आम्हाला नुकसानभरपाई कशी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी करत आहेत.
COMMENTS