शरद पवारांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांचा गोंधळ, राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी !

शरद पवारांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांचा गोंधळ, राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी !

औरंगाबाद  – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप शनिवारी पार पडला. या समारोपादरम्यान शरद पवारांच्या भाषणावेळी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत राष्ट्रवादीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्य़ांनी गोंधळ घातल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. या सभेवेळी औरंगाबादमधील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गोंधळ घातला असं अजित पवार म्हणाले आहेत.

प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील कारखाना सहकारी तत्त्वावर न ठेवता तो राष्ट्रवादीनं खासगी तत्त्वावर ठेवल्याच्या आरोप करत या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचं बोललं जात आहे. परंतु हा कारखाना सहकारी तत्त्वावर न ठेवण्याचा निर्णय सरकारनंच घेतला असून अशाप्रकारचा गोंधळ घालणं योग्य नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर भाजपवर टीका करत प्रशांत बंब यांनी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या सभेत असा गोंधळ घालत असाल तर राज्यात भाजपची एकही सभा होऊ देणार नसल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

 

 

 

COMMENTS