औरंगाबाद : माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज संभाजीनगर (औरंगाबाद) येथे १६८० कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क, शहरातील १५२ कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेली अनेक वर्षे मी शिवसेनाप्रमुखांच्या सभेला इकडे यायचो. त्यानंतर प्रचाराला इकडे येतो. प्रचार असला की आम्ही ओरडून सांगतो, लवकरच पाणी योजना आणू. पण, आज त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि भूमिपूजन करून गप्प बसणार नाही. मी कधीही, न सांगता, न कल्पना देता या कामाची प्रगती बघायला येईन.
संत एकनाथ महाराजांनी पाणी आणायचं काम केलं, तर त्यांच्या शिष्याने कावडीने रांजण भरले. आज मुख्यमंत्री यांनी कावड आणली म्हणून हौद भरत आहे, अशी भावना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की आम्हाला गाडगेबाबा सारखे काम करायचे आहे. पाण्यासाठी व अन्नासाठी. आजपर्यंत औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेची लेझीम सुरू होती. मात्र, माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल.
मी गेल्या आठवड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा हा महामार्ग १ मेपर्यंत सुरू होतोय. नुसत्या घोषणा नाहीत,कामांना गतीही देतोय. गती नसेल तर त्याला काही अर्थ नसेल. हा महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
COMMENTS