बीड – बीड जिल्ह्यासह सबंध देशच नाही तर जगभर कोरोना व्हायरसशी निकराची लढाई सुरू असताना, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शासकीय यंत्रणेला सोबतीला घेऊन अत्यंत उत्कृष्ट रीतीने परिस्थिती हाताळत आहेत. तरीसुद्धा भावनिक विषयांना हात घालून निव्वळ चमकोगिरी करत आ. सुरेश धस हे राजकारण करत आहेत. टीका टिप्पणी करण्यासाठी वेळ काळ काय आहे याचे तरी त्यांनी भान ठेवावे अशा शब्दात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सुरेश धस यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
धनंजय मुंडे यांनी काय काम केले हे विचारणाऱ्या आ. धसांना माहीत नसावे की मुंडे हे गेल्या वीस दिवसांपासून परळीत राहून पूर्ण वेळ शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य विभाग या सर्वांच्या सतत संपर्कात असून वेळोवेळी त्यांना आवश्यक सूचना देत आहेत. आरोग्यविभागाला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंडेंनी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ऊसतोड मजूर बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून उपाययोजना करण्याबाबत अग्रेसर आहेत.
केंद्र व राज्य सरकारने सर्व नेते मंडळींना देखील गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत, सर्वजण ते जबाबदारीने पाळत आहेत. मात्र आ. धस हे केवळ राजकारण साधण्याच्या उद्देशाने स्टंटबाजी करण्यात मग्न आहेत. ऊसतोड मजुरांच्या व्यवस्था प्रश्नी राज्य सरकार कटिबद्ध असून ठिकठिकाणी त्यांची व्यवस्था केली जात आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांच्या भावनांचा असा राजकारण करण्यासाठी वापर करून काय साध्य करायचं आहे? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान इतर जिल्ह्यात जाऊन ऊसतोड मजुरांची भेट घेऊन ठिय्या आंदोलन करण्यामुळे आ. सुरेश धस यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल करत आ. धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. मात्र कोरोनाच्या लढ्यात एकजुटीने सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावे, ही वेळ राजकारण करण्याची नाही; आ. धस यांनी वेळ काळ पाहून राजकारण करावे. भविष्यात कोरोनाच्या लढ्याची जेव्हा आठवण केली जाईल तेव्हा सगळे जग लढत होते आणि धस फक्त राजकीय डावपेच आणि स्टंटबाजी करत होते असा इतिहास लोक सांगतील; अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी आ. धस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
COMMENTS