“बाळासाहेब आणि मुस्लिम”

“बाळासाहेब आणि मुस्लिम”

52 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारला समोर ठेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी मराठी अस्मितेसाठी मोठा लढा उभा केला. मुंबईच्या मिल कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्कासाठी बाळासाहेबांची शिवसेना लढली. आज तीच बाळासाहेबांची शिवसेना 52 वर्षाची झाली आहे. शिवसेनेने 52 वर्षात अनेक उतार चढाव पाहिले. अनेक लोक पक्षात सामील झाले, मोठे झाले, बाहेर पडले. काहींनी निष्ठा राखली.
या सगळ्या कारकिर्दीत जर आपण पहिलं तर बाळासाहेब हे मुस्लिम द्वेषी, मुस्लिम विरोधी असल्याची त्याची प्रतिमा तयार करण्यात आली. आज पण आपण फेसबुक,यूट्यूब वर जर बाळासाहेबांचे भाषण पाहिले तर ते जेव्हा मुस्लिमांविरोधात बोलले तेच भाषण आपल्याला दिसतील. हा असाच प्रकार आहे जसा छ.शिवाजी महाराजांचे फक्त मुस्लिम शत्रू दाखवले जातात पण त्यांचे मुस्लिम मावळे दाखवले जात नाहीत. जर बाळासाहेब हे मुस्लिम द्वेषीय असते तर आज गावागावात पसरलेल्या शिवसेनेत आपल्याला अनेक मुस्लिम शिवसैनिक पहायला मिळाले नसते.

बाळासाहेबांनी अनेकवेळा आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं की, आम्ही देशावर प्रेम करणाऱ्या देशप्रेमी मुस्लिमांच्या विरोधात नसून तर जे देशात राहून देशाशी गद्दारी करतात अश्या लोकांच्या विरोधात आहोत. आणि असायला ही हवं, कारण ज्या देशात आपण राहतो त्या देशाशी आपण गद्दारी नाही करायला पाहिजे अशी इस्लामची शिकवण आहे.
बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जर कोणी मुस्लिम भेटायला गेला आणि नमाजची वेळ झाली तर त्याच्या नमाज पठणासाठी मातोश्रीवर विशेष सोय करण्यात येत होती. त्याचाच एक दृश्य बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित “ठाकरे” या बायोपिकच्या टिझरमध्ये दाखवण्यात आलंय. मग मला सांगा जर बाळासाहेब मुस्लिम द्वेषी असते तर त्यांनी मातोश्रीमध्ये नमाज पडण्याची सोय केली असती का?
ज्या बाळासाहेबांना मुस्लिम द्वेषी म्हणून हिनवल जात त्याच बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित जीवनपटात बाळासाहेबांची भूमिका करणारा मुस्लिम अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची निवड करण्यात आली असती का?
भारतीय जलद गोलंदाज झहीर खान 2004मध्ये भारत पाक क्रिकेट मालिकांसाठी पाकिस्थानात गेला होता, तेव्हा त्याची पाकिस्थानातील डॉन या वृत्तपत्राने मुलाखत छापली होती. त्यात त्याला बाळासाहेबांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
तू भारतात-महाराष्ट्रात राहतो तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वर्चस्व आहे, याचा तुला एक मुस्लिम म्हणून त्रास होतो? यावर त्याने अतिशय सुंदर अस उत्तर दिलं..
तो म्हणाला- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी नाहीत, काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांची इमेज मुस्लिमविरोधी बनवली आहे. मात्र भारतातील देशभक्त मुस्लिमांना ठाकरे किंवा शिवसैनिकांचा कोणता ही त्रास नाही. जे विध्वंसक कृतीमध्ये सहभागी असतात त्यांनाच शिवसेनेचा विरोध आहे.

यापुढे जर सांगायचं म्हणलं तर, मुंबईतील गुन्हेगाराचा कर्दनकाळ ठरलेले एकेकाळीे ज्यांनी मुंबईच्या गँगस्टरचा सफाया केला होता अशे निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या पुस्तकात बाळासाहेबाबद्दलची अतिशय छान अशी आठवण लिहली आहे, ती अशी- महाराष्ट्रात युतीची सत्ता होती, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्याच वेळी मुंबईत एका महात्माची विटंबना झाल्याने दंगल उसळली होती. असे प्रक्षुब्ध वातावरण असताना छगन भुजबळांनी त्या विषयाला धरून शिवसेनेवर शाब्दिक हल्लाबोल केला. तातडीने त्याचे पडसाद शिवसैनिकात उमटले. भुजबळ साहेब राहत असलेल्या ‘बी टेन’ या सरकारी बंगल्यावर हल्ला करण्याचा शिवसेनेत प्लॅन शिजत असल्याची खबर पोलिसांपर्यंत पोहचली. इसाक बागवान त्यावेळी कफ परेड रोड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी आपल्या तुरळक कर्मचाऱ्यासोबत बी टेन बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात झाले. शेकडोचा जमाव भुजबळांच्या बंगल्याकडे येत होता. त्यांच्यावर ऍक्शन घेत असतानाच व्हायरलेस वर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी जमावावर लाठीचार्ज करू नये असा आदेश दिला. जमाव बंगल्यात घुसून नासधूस करू लागल्याने त्यावेळचे गृहमंत्री असलेले स्व. गोपीनाथ मुंडे यांनी व्हायरलेस वर लाठीचार्ज करा असा आदेश दिले. दोघांच्या आदेशामुळे बागवान संभ्रमात पडले तरी त्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांच्या पायाला जमावतील एकाने फेकलेली कुंडी लागली त्यात ते जखमी झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यात इसाक बागवान यांनाही निलंबित करण्यात आलं. इसाक बागवान यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याने थेट मातोश्री गाठली. बाळासाहेबांना आपली कैफियत ऐकवली. तेव्हा आपल्या खास शैलीत शिवसेनाप्रमुख उद्गारले, “राजे…पंतांना फोन लावा.”
पुढल्या क्षणी माननीय शिवसेनाप्रमुखांच्या सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन लावला. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे घडलेल्या घटनेची चौकशी केली, तेव्हा मुकज्यमंत्र्याची गुळमुळीत उत्तरे ऐकून बाळासाहेब आपल्या ठाकरी शैलीत म्हणाले , ” गव्हर्नमेंट गेले खड्ड्यात… यात या पोराची काय चूक? … यांना का सस्पेंड करता? झाले ते खूप झाले, सगळं प्रकार याक्षणी थांबला पाहिजे. आणि बाळासाहेबांनी फोन ठेवला.
दुसऱ्याच दिवशी इसाक बागवान यांचा निलंबन रद्द करण्यात आलं. अशे होते बाळासाहेब, एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे.. जर बाळासाहेब मुस्लिम विरोधी असले असते तर ते इसाक बागवान यांच्या साठी सरकार खड्ड्यात घाला अस मनोहर जोशींना म्हणाले असते का?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच सापडले असतील.

लेखक
मुस्तान मुख्तार मिर्झा

8983833838

COMMENTS