विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची नवी रणनीती !

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची नवी रणनीती !

मुंबई –  आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लवकरच काँग्रेस पक्षाच्या विभागनिहाय बैठका घेण्याचं ठरवलं आहे. विधानसभा तयारीचा आढावा घेण्यासाठी नवी मुंबई, कोकण विभागाची बैठक गुरुवारी तर नाशिक विभागाची बैठक शुक्रवारी आणि पुणे विभागाची बैठक शनिवारी घेण्याचं थोरात यांनी ठरवलं आहे. या आढावा बैठकींना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची मतदारसंघातील स्थिती, यावर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागांवर विजयी करण्याचा बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच प्रत्येक विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बाळासाहेब थोरात नव्याने रणनीती आखणार आहेत. त्यामुळे या बैठकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकीवर काँग्रेसचा भर असणार आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनाही एकत्रित आणण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरात करत आहेत.

COMMENTS