…त्यामुळेच आमचे आमदार भाजपात जाणार असा प्रचार केला जातो – बाळासाहेब थोरात

…त्यामुळेच आमचे आमदार भाजपात जाणार असा प्रचार केला जातो – बाळासाहेब थोरात

मुंबई – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळी थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे.
मोठी जबाबदारी आहे, कठीण काळ आहे हे मान्य आहे, या कठीण काळातील आमची खरी ताकद आमचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांनी चांगली सुरुवात केली तर आम्ही मोठे यश मिळवू शकतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेकदा खूप मोठा फरक झाला आहे. चांगल्या पद्धतीने एकत्र काम करू आणि यश मिळवू, पुढचा मुख्यमंत्री लोकशाही आघाडीचा असेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

तसेच वातावरण खराब करण्याकरता आमचे आमदार भाजपात जाणार असा प्रचार केला जातो. यापूर्वी जेव्हा जेव्हा काँग्रेसवर कठीण काळ आला, काहीजण सोडून गेले, तेव्हा तरुणांनी जागा भरून काढली आणि त्यांचे नेतृत्व पुढे निर्माण झाले, आताही नव्या नेतृत्वाला जागा निर्माण झाली असं समजायचं असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपाने अब की बार 220 पार अशी घोषणा दिली आहे, यापेक्षा जास्त जागा जिंकू अशी घोषणा केली नाही यात आश्चर्य आहे. कोणी काही घोषणा करू शकतो, मात्र मुख्यमंत्री लोकशाही आघाडीचाच होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांना विचारले तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देणार का तेव्हा ते म्हणाले मी कोरं पाकीट आहे त्यावर जो पत्ता लिहिला जाईल तिथे मी जातो, आता त्यांनाच माहीत नाही ते कुठे जाणार त्यांनी आमची काळजी कशाला करायची असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेवरही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचा विचार आहे तो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आम्ही विजय मिळवू असं थोरात यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दाव्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी जास्त प्रामाणिकपणे काम सुरू केलं असं समजायचं असा टोला त्यांनी लगावला आहे.

COMMENTS