महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? –  बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? – बाळासाहेब थोरात

मुंबई – पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्यापपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की,  महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची पाहणी अमित शाह यांनी दुस-या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या समवेत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी त्यांच्यासमवेत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस हे सरकारने स्पष्ट करावे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आज टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभिर्याने पाहिले नाही म्हणून परिस्थिती वाईट झाली. केंद्र सरकारने अद्याप राज्यातील पूराला एल 3 आपत्ती म्हणून जाहीर केले नाही, त्यामुळे अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही. आता हळू हळू पूराचे पाणी ओसरू लागले आहे पण आता स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम राबवणार आहेत तसेच लोकांना मदत करणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातल्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साधे ट्वीटही केले नाही. या पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहे. पशुधन नष्ठ झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे. बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावी या व इतर मागण्यांसाठी उद्या बुधवारी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

COMMENTS