मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही.आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता.
विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नसल्याची नाराजी काँग्रेस मंत्र्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर आज अखेर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर झाली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS