मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार उदयास आलं. त्यानंतर आता जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका एकत्रित लढवण्याबाबतही महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 25 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही एकत्र लढवण्याची तयारी सुरु असून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि विनायक राऊत, काँग्रेसतर्फे मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे असणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
तसेच 30 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार आहेत. तीनही पक्ष एकत्र आले तर 25 पैकी 22 जिल्हा परिषदांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता येणार आहे.
सध्या तेरा ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. तीन पक्ष एकत्र आले तर भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचंही थोरात यांनी म्हटलं आहे.
COMMENTS