पुणे – बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सचिन सदाशिव सातव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बारामती कोर्टाने दिले आहेत. बारामती मोटार वाहन संघात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सातव यांच्याबरोबर, संस्थेचे अध्यक्ष दीपक वीरसिंग तावरे आणि सचिव सौरभ गांधी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
बारामती मोटार वाहन संघात दोन कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सातव यांच्यावर आहे. तसेच, नोटाबंदीदरम्यान स्वतःच्या खाजगी व्यवसायातील एक कोटी ७३ लाख रुपये संस्थेच्या खात्यावर जमा केल्याचा देखील आरोप त्यांच्याव आहे. बारामती मोटार वाहन संघाचे खजिनदार प्रमोद सातव यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांसमोर आणि कोर्टासमोर आम्ही आमची बाजू मांडू. त्यातून वस्तुस्थिती समोर येईल. अशी प्रतिक्रिया सचिन सातव यांनी दिली आहे.
COMMENTS