नागपूर – बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सत्तेचं त्रांगडं अजून सुटलेलं नाही. बाजार समितीमध्ये कोणत्याही आघाडीला किंवा गटला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यासमक्ष राजेंद्र मिरगणे यांची नागपुरात भेट घेतली. त्या भेटीनंतर मिरगणे यांनी राऊत यांना पाठिंबा दिल्याचं वृत्त काही ठिकाणी आलं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं राजेंद्र मिरगणे यांनी महापॉलिटिक्सला बोलताना सांगितलं. सहका-यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असंही राजेंद्र मिरगणे यांनी स्पष्ट केलं आहे.
बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. आमदार दिलीप सोपल यांच्या गटाला 7 जागा मिळाल्या आहेत. तर राजेंद्र मिरगणे यांच्या पॅनलला 2 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 10 सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे राजेंद्र मिरगणे गटाच्या दोन सदस्यांना महत्वं आलं आहे. राजेंद्र मिरगणे हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी तालुक्यातील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर आणि काँग्रेसचे तालुक्यातील नेते जीवनदत्त अरगडे यांच्यासोबत एकत्र पॅनल तयार केले होते. त्यामुळे त्यांच्यांशी चर्चा झाल्याशिवया पाठिंब्याबाबत निर्णय नाही असंही राजेंद्र मिरगणे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच सांगितलं असंही मिरगणे म्हणाले. त्यामुळे आता मिरगणे यांच्या पॅनलचा काय निर्णय होतो त्यावरच बाजार समितीमधील सत्ता समिकरणे अवलंबून आहेत.
COMMENTS