सोलापूर – अत्यंत चुरशीची ठरलेल्या बार्शी बाजार समिती निवडणुकीमध्ये 18 जागांसाठी आज मतमोजणी झाली. शेतकरी गणातून 15 ,व्यापारी गणातून 2,तर हमाल तोलार गटातुन 1 अशी निवडणूक लढवण्यात आली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर बार्शी बाजार समितीमध्ये त्रिशंकू स्थिती पहायला मिळत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या दिलीप सोपल गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. तर भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या निववडणुकीत भाजपचे नेते आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. तर 7 जागा दिलीप सोपल गटाला मिळाल्या आहेत, तर 2 जागांवर राजेंद्र मिरगणे गटाने बाजी मारली आहे.
दरम्यान बार्शी बाजार समितीच्या निकालातून त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापन करण्याचा पेच राऊत गटासमोर निर्माण झाला आहे. “सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही राजेंद्र मिरगणे यांची मदत घेऊ, ते देखील आम्हाला मदत करतील, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी पत्रकारांना दिली आहे. तर “राऊत यांना मदत करण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, माझ्या सहकारी नेत्यांशी बोलावं लागेल” असं मिरगणे यांनी राऊत यांच्या प्रतिक्रियेवर महापॉलिटिकसच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्टीकरण दिल आहे. त्यामुळे राजेंद्र मिरगणे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
विजयी उमेदवारांच्या नावाची यादी
दरम्यान गेल्या 25 वर्षांपासून सोपल यांचं बाजार समितीवर वर्चस्व होतं. परंतु या निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला हादरा देत राऊत गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत परंतु तरीही त्यांना बहुमताने हुलकावणी दिली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या जामगाव (आ) गणातून राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांनी सर्वाधिक मताने विजय संपादित केला आहे. तर उक्कडगाव गणातून दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीच्या निकालातून तालुक्यातील ग्रामीण भागात राऊत -सोपल यांचं मताधिक्याबाबत उत्सुकता होती, यात राऊत यांनी बाजी मारल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
COMMENTS