बीड – मतदारांची आक्रमता पाहून मत मागायला गेलेल्या आमदार पुत्राला सभेतून काढता पाय घ्यावा लागला आहे. आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या मुलावर ही वेळ आली आहे. तुम्ही कधी गावकऱ्यांना योग्य मदत करत नाही त्यामुळे उगाच तुम्ही गावकऱ्यांना काही शिकवू नका असं सांगत लोक आक्रमक झाले होते. त्यांची आक्रमकता पाहून आमदार पुत्र अजय धोंडे यांनी सभेतून काढता पाय घेतला आहे.
दरम्यान भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे सुपुत्र अजय धोंडे यांनी मतदारसंघातील शिरूर कासार तालुक्यातील टेंभुर्णी येथे कॉर्नर सभेचं आयोजन केलं होतं. सभेसाठी आमदाराचे सुपुत्र अजय धोंडे उपस्थिती होते यावेळी सभा सुरु होताच अजय धोंडे यांनी गावातले लोक राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना मदत करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुम्ही मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं काम केलं पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. त्यानंतर आमदार पुत्रांच्या या वक्तव्याने लोक चांगलेच भडकले. एका कार्यकर्त्याने उभे राहून त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली.
गोपीनाथ मुंडे असताना धोंडे हे काँग्रेसमध्ये होते. तोच धागा पकडत त्या कार्यकर्त्याने त्यांना चांगलंच सुनावलं. बाळासाहेब आजबे काका कसेही असो पण त्यांनी मुंडे साहेबांना कधी विरोध केला नाही की त्रास दिला नाही. उलट तुम्हीच त्यांना त्रास दिला. आजबे आम्हाला मदत करतात. मात्र तुम्ही हात आखडता घेता. गावात धार्मिक सप्ताह असो की कुठला कार्यक्रम तुम्ही पैसे थोडे देता आणि जास्त चकरा मारायला सांगता. कार्यकर्त्यांच्या या वक्तव्यानंतर अजय धोंडे समर्थकांनी या तरुणाला धक्के देत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी अधिकच आक्रमक झाले. लोकांना बोलू द्या, त्यांचा अधिकार आहे असं म्हणत सभेत गोंधळ सुरू झाला. त्यानंतर परिस्थिती अनुकूल नसल्याचे पाहून आमदार पूत्र असलेल्या अजय धोंडे यांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला.
COMMENTS