बीडमध्ये चारा छावणीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानं केला भ्रष्टाचार ?

बीडमध्ये चारा छावणीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानं केला भ्रष्टाचार ?

बीड – बीडमध्ये चारा छावणीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानं भ्रष्टाचार केला असल्याचं समोर आलं आहे. उपजिल्हाधिकार्‍यांच्या तपास पथकानं हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या तालुक्यातील कोल्हारवाडी इथल्या चारा छावणीला माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या पथकानं भेट दिली. चारा छावणीत तब्बल 800 बोगस जनावरे दाखवण्यात आली होती. यावेळी छावणी तपासणीसाठी आलेल्या पथकाला रोखण्यात आले.

दरम्यान छावणी ‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालवली जात असली तरी प्रत्यक्षात छावणी चालक हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. विशेष म्हणजे छावणीची तपासणी होऊ नये यासाठी तेथील विद्युत पुरवठा तोडण्यात आला. यासंदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने पोलीस उपअधीक्षकांसह मोठा फौजफाटा छावणीवर पाठवला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात छावणीची तपासणी करण्यात आली. यावेळी छावणीत बोगस जनावरं दाखवल्याचं उघड झालं आहे.

असा केला भ्रष्टाचार

3 मार्चला सुरु झालेल्या या छावणीत काही दिवसातच जनावरांचा आकडा 1600 वर पोचल्याचे अहवाल सांगण्यात आलं आहे. या छावणीत 30 आणि 31 मार्च रोजी प्रत्येकी 1612 जनावरांची नोंद आहे. 1 एप्रिल रोजी सकाळीच म्हणजे तलाठ्यांनी अहवाल देण्याअगोदरच अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी या छावणीला भेट दिली होती. त्यादिवशीची जनावरांची संख्या थेट 871 इतकी नोंदवण्यात आली. म्हणजे एका रात्रीत तब्बल 741 जनावरे कमी झाली. एका रात्रीतून इतकी जनावरे गेली कुठे आणि कशी या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला अद्याप छावणी चालकांनी दिलेले नाही. 6 मे रोजी पुन्हा जनावरांच्या आकड्याने 1607 ही संख्या गाठली आहे. आजचा आकडा 1600 च्या घरात आहे. मात्र प्रत्यक्ष 800जनावरे दिसून आल्यानंतर भ्रष्टाचार उघडकीस आला.

COMMENTS