बीड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून केज विधानसभा संघातील काँग्रेसच्या नेत्या डॉ. अंजली घाडगे यांनी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे-खाडे यांचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असून त्या उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.कालच काँग्रेसचे परळीतील नेते राजेश देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर अंजली घाडगे यांच्या रूपाने काँग्रेसला हा दुसरा दणका बसला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान अंजली घाडगे यांनी २०१४ साली काँग्रेसकडून केज विधानसभा लढविली होती. नवख्या उमेदवार असूनही अंजली घाडगे यांनी २०१४ च्या २३,०११ मते घेतली होती. पराभवानंतरही त्या मतदार संघातील जनतेच्या संपर्कात राहिल्या. आगामी विधानसभा लढविण्यासही त्या इच्छुक आहेत. परंतु, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तडजोडीत केज मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याने अंजली घाडगे पर्यायाच्या शोधात होत्या.
मागील काही दिवसापासून त्यांच्या फेसबुक पोस्टमधून पक्षाचा उल्लेख गायब झाला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांनी थेट डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करत असल्याच्या पोस्ट केल्या. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS