बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचा दुष्काळ दौरा, ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याला म्हणाले, “तुम्ही आराम करा, मी वाऱ्या करतो !”

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचा दुष्काळ दौरा, ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याला म्हणाले, “तुम्ही आराम करा, मी वाऱ्या करतो !”

बीड – परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.

परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी पालकमंत्री श्री मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजय सिंह पंडित, उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

माजलगाव तालुक्यातील तालखेड-धर्मेवाडी, श्रृंगारवाडी, फुले पिंपळगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्याची भूमिका पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली.

फुले पिंपळगाव येथील शेतकरी शेख शब्बीर शमशोद्दिन यांच्या चार एकर शेतातील सोयाबीनचे क्षेत्र यामुळे वाया गेल्याचे दिसून आले; यावेळी बोलताना पालक मंत्री श्री मुंडे म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात असून शासनस्तरावरून यापूर्वी पंचनामे झाले आहेत परंतु सरकार म्हणून या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, तसेच अंतरपिकांचाही समावेश पंचनाम्यांमध्ये करण्यात यावा अशा सूचना यावेळी मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वडवणी तालुक्यातील पुसरा आणि मोरवड या गावातील पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री मुंडे म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने जिल्ह्यात सोयाबीन कापूस सह विविध पिकांची चांगली पेरणी झाली होती. तसेच येणाऱ्या उत्पादनाची मोठी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाच्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या हातातले पिक गेले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने कापणी पूर्वी नुकसान झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी कापणी झालेलं सुगी झालेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाऊ नये; यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश सोळंके जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी निकम आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विरोधक बिहारमध्ये!

दौऱ्या दरम्यान माध्यमांशी एका प्रश्नावर बोलताना, सरकारचे मंत्री शेतावर जाऊन पाहणी करत आहेत, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, विरोधक मात्र बिहार निवडणुकीत व्यस्त आहेत, असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना नाव घेता लगावला.

तुम्ही आराम करा, मी वाऱ्या करतो

मिरकाळा ता. गेवराई येथे एक वृद्ध दाम्पत्याने झालेल्या नुकसानीची व्यथा मांडताना भावुक झाले, आम्ही चार धाम केले, अनेक वर्ष वाऱ्या करत आहोत, निसर्गाने आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला, असे म्हणताच धनंजय मुंडे यांनी, बाबा तुम्ही आता आराम करा, मी तुमचा मुलगा आहे असं समजा, यापुढे तुमच्यावरची वारी मी करत जाईन, असे म्हणून त्या वृद्ध दाम्पत्याला धीर दिला.

विमा कंपनीने प्रशासकीय पंचनामे ग्राह्य धरावेत यासाठी प्रयत्न

जिल्ह्यातील १७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला असून, झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देण्यासाठी अद्ययावत अॅप निर्माण केले आहे. त्याचबरोबरीने विमा कंपनीने कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

COMMENTS