धनगर आंदोलनाची धग, बीड जिल्ह्यात परळी वगळता 12 ठिकाणी चक्का जाम !

धनगर आंदोलनाची धग, बीड जिल्ह्यात परळी वगळता 12 ठिकाणी चक्का जाम !

बीड – आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून बीड जिल्ह्यत अनेक ठिकाणी चक्का जाम करण्यात आला होता. जिल्ह्यात परळी वगळता बारा ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाची धग कायम असताना आता या पाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आता चांगलीच भर पडली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आज बीड जिल्ह्यात युवा मल्हार सेनेच्यावतीने बारा ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.आंदोलनकर्त्यांनी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक तासभर रोखुन चक्का जाम आंदोलन केले. दरम्यान यावेळी सरकार विरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव, उमापूर, गेवराई, धारूर या ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. येत्या काळात सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणावर गांभीर्याने विचार न केल्यास जेलभरो करून धनगर समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

अंबाजोगाईत लोकमाता अहिल्यामाई होळकर चौक येथे धनगर समाज बांधवांनी शांततेत चक्का जाम आंदोलन केले. यावेळी मोठय़ा संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. तसेच मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यापारी बांधवांनी स्वखुशीने व्यापार पेठ बंद ठेवून धनगर समाज बांधवांच्या लढ्याला सहकार्य केले. शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी बंदमध्ये स्वंयस्फूर्थीने शाळा बंद ठेवून धनगर समाज बांधवांच्या अमलबजावणी मागणीस पाठिंबा दिला आहे.

COMMENTS