बीड – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. परंतु त्यापूर्वी विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत. अनेक संस्थांच्या एक्झीट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. तसेच राज्यातही आघाडीला कमी जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.
‘न्यूज 18’च्या एक्झिट पोलमधून देशभरातील मतदारसंघांबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यानुसार बीडमध्ये भाजपच्या उमेदवार
प्रितम मुंडे यांचा विजय होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव होणार असल्याचं बोललं जात आहे.या निवडणुकीत बीडमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बाहिण-भावामध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली.
प्रितम मुंडे यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 9 लाख 22 हजार मत मिळाली होती. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्याने निवडून आल्या होत्या. या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३७ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीच्या ५ जागा वाढून ११ जागांपर्यंत आघाडी मजल मारणार असून भाजप-शिवसेनेला ५ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
COMMENTS