बीडमध्ये राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार ठरले ?

बीडमध्ये राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार ठरले ?

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधील विजयी संकल्प मेळाव्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पवाराच्या या सभेतून अनेक संकेत दिले गेले. त्यांच्या सभेत उमेदवारीबाबत काहीही घोषणा झाली नसली तरी बरचं काही ठरल्याचं दिसून येतंय. पक्षातली गटबाजी त्यांच्यासमोर उफाळली. पण सर्व गट एकत्र आले हेही नसे थोडके असचं म्हणावं लागेल.

पवारांच्या सभेत अनेक नेत्यांची भाषणे  झाली. राज्यपातळीवरील नेते, जिल्हाअध्यक्ष आणि प्रत्येक विधानसभेतून एका व्यक्तीला बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये बीडमधून  जयदत्त क्षीरसागर, परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून अमरसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाश सोळंकी, केजमधून अक्षय मुंदडा, आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांना संधी देण्यात आली होती. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून बोलण्याची संधी मिळालेले नेते किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीच विधानसभेचे संभाव्य उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभा लढवणार हे निश्चित आहे. माजलगावमधून प्रकाश सोळुंके यांची उमेदवारी निश्चित आहे. आष्टीतून बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी निश्चित आहे. गेवराईमधून पंडित घराण्यातीलच उमेदवार असणार यात शंका नाही. त्यामध्ये फक्त अमरिसंह पंडित की विजयसिंह पंडित एवढाच प्रश्न बाकी आहे. राहता राहिला केज आणि बीडमधील विधानसभेचा उमेदवार.

केजमधील मुंदडा कुटुंब गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अलिप्त होतं. धनंजय मुंडे, प्रकाश सोळुंके आणि अमरसिंह पंडित या गटावर नाराज आहे. परंतु काही दिवसांपूर्वी अक्षय मुंदडा यांनी मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेतली. तर पवारांच्या बीडच्या दौ-यात मुंदडा कुटुंब पवारांसोबतच होतं. यावेळी बोलताना अक्षय मुंदडा यांनी त्यांच्या आई म्हणज्ये स्वर्गीय विमलताई मुंदडा यांची एक आठवण सांगितली. एकवेळ राजकारण सोड पण पवारसाहेबांना सोडू नको असं आई म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता अक्षय मुंदडा यांच्या पत्नीलाच केजमधून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सगळ्यात महत्वाचा तिकीट असेल ते बीडमधून. बीडमधून विधानसभेच्या तिकीटावरुन राष्ट्रवादीमध्ये क्षीरसागर कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. त्यातून पक्षाला मार्ग काढावा लागणार आहे. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतच राहीले तर तिकीट कोणाला द्याचे याचा यक्ष प्रश्न राष्ट्रवादीला आहे. त्यावर तोडगा म्हणून जयदत्त क्षीरसागर यांना लोकसभेचे आणि संदीप क्षीरसागर यांना विधानसभेचे तिकीट दिले जाऊ शकते असा मध्यम मार्ग निघू शकतो अशीही चर्चा सुरू आहे. राजकारण हे क्रिकेटसारखं अनिश्चिततेचा खेळ झालं आहे. शेवटपर्य़ंत काय होईल हे सांगता येत नाही. मात्र पवारांची सभा बरचं काही सांगून गेली असंही म्हणता येईल.

COMMENTS