बीड – बीड जिल्ह्यात जादूच्या कांडीचा प्रभावी प्रयोग दाखविण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी आ. सुरेश धस यांना भाजपात घेतले. त्यांचे पाच जिल्हा परिषद सदस्य घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. परंतु त्याची परतफेड पंकजाताईंनी त्यांना थेट विधानपरिषदेची आमदारकी देऊन केली. केवळ आमदारकीवर शांत बसणारे सुरेश धस कसले? आता त्यांचा डोळा हा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर असल्याचे दिसू लागले आहे. त्यासाठी लॉबिंग केल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून आ. सुरेश धस पंकजाताईंना ओव्हरटेक करणार असा सूर जिल्ह्यात सुरू आहे.
आ. सुरेश धस हे कधीही स्वस्थ बसणारे नेतृत्व नाही. सतत अस्वस्थ आणि सत्तेच्या जवळ जाणारे नेतृत्व आहे. विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच म्हणजे साधारणतः अडीच वर्षानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. पंकजाताईंना परळीतून व्हाईटवॉश मिळाल्याने जिल्हा परिषद ताब्यात घेऊन जादूची कांडी प्रभावी असल्याचे दाखवून दिले. परंतु त्यावेळी त्यांनी सुरेश धस यांचा आधार घेतला. त्यांचे पाच जि. प. सदस्य सोबतीला घेऊन निर्विवादपणे वर्चस्व निर्माण केले. त्याची उतराई तात्काळ पंकजाताईंनी विधान परिषदेची आमदारकी देऊन केली. त्या बदल्यात रमेश कराड यांचा नाहक बळी गेला. तरी देखील सुरेश धस यांच्यासाठी विधान परिषदेचा मार्ग मोकळा करून दिला. आता तेच सुरेश धस स्वतःला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे. यासाठी आग्रही असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे. तशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. त्या संबंधितांच्या प्रेसनोट देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. सुरेश धस हे ओव्हरटेक करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि ते पदासाठी काहीही करू शकतात. याचा अनुभव बीड जिल्ह्याला नवा नाही.
जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यानंतर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या आग्रहाखातर धस यांना आष्टीमधून विधानसभेची उमेदवारी दिली. सुरेश धस आमदार झाले. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच सुरेश धस यांनी स्व. मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी आमदारकी मिळवून राज्यमंत्रीपद प्राप्त केले. शिवाय महानंदचे अध्यक्षपद मिळवले. 2014 च्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले. आणि भीमराव धोंडे यांना विजयी केले. परंतु सत्तेशिवाय धस स्वस्थ राहू शकत नाहीत. त्यांनी थेट फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर थेट पंकजाताईंना आपले सदस्य देऊन जिल्हा परिषद ताब्यात घेतली. पंकजाताई यांचा परळी तालुक्यात व्हाईटवॉश झाल्याने जिल्हा परिषद ताब्यात घेऊन जादूची कांडी प्रभावी असल्याचे दाखवून दिले. त्या बदल्यात धस यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीने खेळी करत भाजपच्या रमेश कराडांना राष्ट्रवादीत घेतले आणि उमेदवारी दिली. त्यानंतर कराडांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु अचानक उमेदवारी अर्ज काढण्याच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षश्रेष्ठीच्या रोषाला सामोरे जावे लागले. हे मोठे कांड घडवून आणल्याची चर्चा त्यावेळी होती. सुरेश धस यांनी आपला विधान परिषदेचा मार्ग मोकळा करून घेतला. आज ते आमदार आहेत. परंतु केवळ आमदारकीवर शांत राहणारे सुरेश धस कसले? आता त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद खुणावू लागले आहे. मुळात पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळावी आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी तमाम कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु त्याआधीच धस यांना जाण्याची घाई झाली आहे. त्यांच्या समर्थकांकडून तशी मागणी माध्यमांद्वारे केली जात आहे.
सुरेश धस हे पंकजाताईंना ओव्हरटेक करून विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. त्यामुळे येणार्या काळात आणखी काय काय घडामोडी जिल्ह्यात घडणार याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS