मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बीड जिल्हयात मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता शासनाने बीड जिल्हा परिषदेला दहा कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने आज यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेस शुध्द व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरू केली आहे, योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता तीनशे कोटी इतक्या रकमेची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून विनियोजन विधेयक मंजूर होईपर्यंतच्या कालावधीचा खर्च भागविण्यासाठी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर शंभर कोटी रुपये इतका निधी वित्त विभागाने उपलब्ध करून दिला आहे. सदर निधीतून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता जिल्हा परिषद बीड व सोलापूर यांना १३ कोटी ३० लक्ष ४८ हजार इतके अनूदान मंजूर करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेला यातील १० कोटी १ लाख ९२ हजार इतका निधी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने वितरित केला आहे. आज यासंदर्भातील आदेश शासन निर्णय क्रमांक मुपेयो-२०१९/प्रक्र ६१/पापू १९/ दि. १७ जून २०१९ अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
——————————
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाला सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्यामुळे हा निधी आता वितरित झाल्यामुळे जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
COMMENTS