नवी मुंबई – बेलापूरच्या जागेवरुन युतीत खडाखडी, भाजपचा आमदार असलेल्या जागेवर शिवसेनेची तयारी !

नवी मुंबई – बेलापूरच्या जागेवरुन युतीत खडाखडी, भाजपचा आमदार असलेल्या जागेवर शिवसेनेची तयारी !

नवी मुंबई – गणेश नाईक यांच्या साम्राज्याला धक्का देत 2014 मध्ये भाजपाच्या मंदाताई म्हात्रे आमदार झाल्या. चौरंगी लढतीमध्ये त्यांनी निसटता विजय मिळवला. मात्र त्यानंतर सहाच महिन्यनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला आणि मंदाताई म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघात प्रभाव पाडता आला नाही. बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक निवडूण आले. तेही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर. या मतदारसंघात नगरसेवकांचा विचार करता राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते या जागेवर दावा करत आहेत.

गेल्यावेळी शिवसेनेकडून या मतदारसंघातून विजय नहाटा यांनी निवडणूक लढवली होती. ते तिस-या क्रमांकवर फेकले गेले होते. गणेश नाईक दुस-या क्रमांकवर होते. तर काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नामदेव भगत हे चौथ्या क्रमांकवर फेकले गेले होते. विधानसभा निवडणुकीनंतर नामदेव भगत यांनी शिवबंधन हाती घेतले आहे. आता पुन्हा एकदा विजय नाहटा कामाला लागले आहेत. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मंदाताई म्हात्रे मात्र या जागेवरचा दावा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला मिळते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.

भाजपचा विद्यमान आमदार असल्यामुळे ही जागा भाजपला मिळावी अशी भाजपची मागणी आहे. तर मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद जास्त असून पक्षाचे नगरसेवकही जास्त आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिवसेनेची मागणी आहे. दुसरीकडे ऐरोली मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचे उमेदवार दुस-या क्रमांकवर होते. राष्ट्रवादीने ऐरोलीची जागा जिंकली होती. त्यामुळे ऐरोलीच्या जागेवर शिवसेनेनं दावा केला आहे.

COMMENTS