मुंबई – सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल करत अखेर भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर आता तिथून पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजप आता या पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. फुके हे सध्या विधान परिषदेत भाजपचे आमदार आहेत. उच्च शिक्षित असेलले फुके हे भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आमदार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय, उच्च शिक्षीत आणि क्लिन इमेज यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुके यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नागपूर महापालिकेतून सुरुवात केली होती.
भाजपकडून डॉ. फुके यांना उमेदवारी दिल्यास विरोधी उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवायची की नाही याबाबत निर्णय घेऊ असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे ते लढतात की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र ते आता लोकसभेपेक्षा विधानसभाच लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आघाडीमध्ये ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आता नाना पटोले काँग्रेसमध्ये आले तर जागा कोणाकडे आणि उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS