पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 19 वा वर्धापन दिन आहे. त्याचसोबत हल्लाबोल यात्रेची शेवटची सभा आज पुण्यात होणार आहे. मात्र या सभेत उत्सुका लागली आहे ती पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ काय बोलणार याकडे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तब्बल अडीच वर्षानंतर छगन भुजबळ माध्यमांना बोलले नाहीत. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. त्यामुळे तर त्यांच्या भाषणाची जास्तच उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
तुरुंगात गेल्यापासून भुजबळ यांच्याविषयी विविध चर्चा सुरू होत्या. कधी पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चा माध्यमातून झाल्या. कधी भाजपनं जाणूनबूजन त्यांना तुरुंगात जास्त काळ ठेवल्याचा आरोप प्रत्यारोपही झाले. तसंच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विविध नेत्यांनी त्यांच्या घेतलेल्या भेटी, मातोश्रीशी वाढलेली जवळीक, शिवसेनेत पुन्हा परतणार अशा वावड्या. या सर्वविषयांवर भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कालच राज्य काँग्रेसच्या बैठकीमध्ये सपा, बसपा, आरपीआय या पक्षांसह सर्वच धर्मनिरपेक्ष महाआघाडी करण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. तो आता राहुल गांधी यांच्याकडे सोपवला जाणार आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांचा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांच्याही भाषणाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पोटनिवडणुकीत विजयी झालेले भंडरा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनाही या कार्यक्रमासाठी खास निमिंत्रित कऱण्यात आलं आहे.
गेल्या लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार पुन्हा पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कामाला लागले आहेत. पुणे जिल्ह्यातला बालेकिल्ल्याची पुन्हा डागडूजी करण्यासाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित पवार यांनी चांगली मेहनत घेतली आहे. आज संध्याकाळी ही सभा होणार आहे.
COMMENTS