मुंबई – कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात सापडलं आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश अर्थखात्याने दिले असून राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली केली जाणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत.
दरम्यान राज्य सरकारकडून जे जे कार्यक्रम घेतले जातात ते आता रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो, मात्र त्याला आता कात्री लावण्यात आली आहे. तसेच अर्थविभागाच्या आदेशानुसार जी कामं सध्या चालू आहेत, ती स्थगित करण्यात येणार आहेत, तर नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. नोकरभरतीलाही मोठा फटका बसला असून भाजप सरकारच्या काळात रखडलेली 72 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. परंतु आता तोही स्थगित करण्यात आला आहे.
तसेच या आर्थिक वर्षात कोणत्याही नव्या योजनांवर खर्च करू नये. तसेच ज्या खर्चात वेतन किंवा वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानाचा समावेश आहे तेथेच निधी वितरणाच्या मर्यादेत खर्च करावा. ज्या योजना अत्यावश्यक आहेत त्यांच्याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून त्या अंतिम कराव्यात असही अर्थखात्यानं म्हटलं आहे.
COMMENTS