बिहारमध्ये काँग्रेसमुळे महागठबंधनचा पराभव झाला ? वाचा ही बातमी आणि तुम्हीच ठरवा !

बिहारमध्ये काँग्रेसमुळे महागठबंधनचा पराभव झाला ? वाचा ही बातमी आणि तुम्हीच ठरवा !

मुंबई – बिहारमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत एनडीएनं बाजी मारली आहे. एनडीएनं 125 जागा जिंकल्या. महागठबंधनला 110 जागांवर समाधान मानावं लागलं. एनडीएमध्ये भाजपला 74, जेडीयूला 43, हिंदुस्तान अवामी मोर्चा या पक्षाला 4 तर व्हिआयपी पक्षाला 4 अशा जागा मिळाल्या आहेत. महागठबंधनमध्ये राजदला 75, काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत. इतरांमध्ये एमआयएमला 5, बसपा 1, लोजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी बहुतेक एक्झीटपोलनी महागठबंधनला काठावरचं का होईना बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र झालं उलटं. असं का झालं ? महागठबंधनच्या पराभवाची कारणे काय आहेत ? याची चर्चा आता सुरू झालीय. पहिलं महत्वाचं कारण ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ते म्हणज्ये महागठबंधनचा पराभवाला काँग्रेस जबाबदार आहे. या चर्चेला आधार काय ते पाहूया…
काँग्रेसनं स्वतःच्या ताकदीपेक्षा जास्त जागा घेतल्या आणि लढवल्या. त्या तुलनेत त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत असा काँग्रेसवर आरोप होतोय. काँग्रेसनं 70 जागा लढवल्या. त्यापैकी केवळ 19 जागा त्यांना जिंकता आल्या. म्हणज्ये त्याचा जागा जिंकण्याचा स्ट्राईक रेट 27.14 होतो. राजदनं 143 जागा लढवून 75 जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट  52.44 तर डाव्यांनी 30 जागा लढवून 19 जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट हा तब्बल 63 एवढा आहे. यावरुन काँग्रेसला अपयश आल्यामुळे. महागठबंधनच्या पराभवाला हातभार लागला हे खरं आहे असंचं म्हणावं लागेल.

काँग्रेसनं कमी जागा लढवल्या असत्या आणि आणखी काही मित्र पक्षांना जागा दिल्या असत्या तर त्याचा महागठबंधनला फायदा झाला असता असं समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येतंय. व्हिआयपी पार्टी हा पक्ष शेवटपर्य़ंत महागठबंधन सोबत होता. मात्र त्यांना योग्य जागा दिल्या नाहीत. त्यामुळे अगदी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समधून व्हिआयपी पार्टीचे नेते बाहेर पडले आणि एनडीएला जाऊन मिळाले. व्हिआयपी पक्षानं 11 जागा लढवल्या आणि 4 जिंकल्या. तेच जर महागठबंधनसोबत असते तर त्यांनी जिंकलेल्या 4 जागा आणि इतर साधारण 4 ते 5 जागांवर महागठबंधनला फायदा झाला असता. म्हणज्ये व्हिआयपी पक्षामुळे महागठबंधनला साधारण 8 जागांचा फायदा झाला असता. आणि चित्र आतापेक्षा अगदी उलटं झालं असतं.

पण महागठबंधनच्या पराभवाचं हेच एकमेव कारण आहे का ?  तर नाही. मग दुसरं महत्वाचं कारणं कोणतं ? एमआयएमुळे महागठबंधनच्या जवळपास 10 ते 15 जागा पडल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मुस्लिम बहुल सीमांचल आणि इतर मुस्लिम बहुल भागात एमआयएमचे उमेदवार होते. त्यांनी 20 जागा लढवल्या. त्यापैकी 5 जागा जिंकल्या. तर इतर अनेक ठिकाणी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. तिस-या टप्प्प्यात मुस्लिम बहुल सीमांचलचा समावेश होता. त्यामध्ये एनडीएला तब्बल 52 जागा मिळाल्या. तर महागठबंधनला केवळ 20 जागांवर समाधान मानावं लागलं.

बिहारमध्ये महागठबंधनच्या पराभवाला काँग्रेस काही प्रमाणात का होईना जबाबदार आहे. मात्र केवळ काँग्रेसमुळे पराभव झाला असं म्हणणंही बरोबर नाही. एमआयएममुळे मुस्लिम मतांमध्ये झालेली फूट आणि नितीश कुमार यांनी शेवटच्या टप्प्यात शेवटची निवडणूक असं केलेलं भावनिक आवाहन यामुळे तिस-या टप्प्यानं एनडीएला हात दिला असंच म्हणावं लागेल.

COMMENTS