मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बोरिवलीतून सुनिल राणे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंह ठाकूर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, तुमसरमधून प्रदीप पडोले, कुलाबामधून राहुल नार्वेकर तर नाशिक पूर्वमधून राहुल डिकळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपचे एकूण 150 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु या यादीतही भाजपनं विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिली नाही.
दरम्यान मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे अजूनही वेटिंगवर आहेत. तसेच नाशिक पूर्वमधून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांच्या जागी राहुल डिकळे यांना उमेदवारी दिली आहे. तर तुमसरमधील विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्या जागी प्रदीप पडोले यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकीट का मिळालं नाही? याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींशी नक्कीच करेन. पण आत्ता नेशन फर्स्ट यानुसार पक्षाला दोन तृतीयांश मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार’, असं विनोद तावडेंनी जाहीर केलं आहे. माझ्या मंत्रीपदाच्या काळात तिकीट न देण्यासारखं काही घडलं नाही. त्यामुळे तसंच जर काही असेल, निवडणुका झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. जर माझं काही चुकलं असेल, तर पक्षश्रेष्ठी मला सांगतील आणि जर पक्षाचं काही चुकलं असेल, तर ते चूक सुधारतील’, असं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
दरम्यान तिकीट न मिळाल्यामुळे तावडे नाराज होऊन पक्ष सोडतील असं बोललं डात होतं परंतु मी संघाच्या आणि भाजपच्या मुशीत तयार झालो आहे. मी भाजपला सोडणं शक्यच नाही. तशा चर्चा केल्या गेल्या. आत्ता तरी माझ्यासाठी भाजपला दोन तृतीयांश मतांनी जिंकून आणणं हेच माझं ध्येय आहे. निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल’, असं देखील विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS