मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चार आमदारांना नारळ दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे मतदारसंघातील आठपैकी किमान चार मतदारसंघातील आमदारांच्या जागी नवे चेहरे मैदानात उतरविले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, शिवाजीनगर, कोथरुड, या मतदारसंघातील आमदारांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ
दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांना विश्रांती दिली जाण्याती शक्यता आहे. कांबळे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षात, तसेच मतदारसंघात नाराजी आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचेही या मतदारसंघात तगडे आव्हान आहे. त्यामुळे कांबळे यांच्या जागी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हडपसर मतदारसंघ
हडपसर मतदारसंघातही भाजपकडून नवीन चेहय्राला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना पुन्हा तिकीट देण्याबाबत संभ्रम आहे. विरोधकांनी त्यांच्याविरोधात केलेल्या कथित आरोपांमुळे टिळेकर यांच्याविषयी पक्षाच्या प्रदेशातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मतदारसंघातील विकास रासकर यांच्याकडे पक्षाच्या ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे सोपविली आहेत. त्यामुळे टिळेकर यांना पक्षांतर्गत आव्हान उभारले आहे. तसेच शिवसेनाही या मतदारसंघाची आग्रही मागणी करण्याची शक्यता आहे.
कोथरूड मतदारसंघ
तसेच कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांच्यापैकी किमान एका जागी नवीन चेहय्राला संधी देण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरला खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर कोथरूडला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा बोलबाला आहे. गेल्या निवडणुकीतही ते उमेदवारीच्या स्पर्धेत शेवटपर्यंत होते. मात्र, पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्या पाठिंब्यामुळे नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते.
कसबा पेठ मतदारसंघ
तसेच कसबा पेठ मतदारसंघात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सलग पाचवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले गिरीश बापट हे खासदार झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्या जागी महापौर मुक्ता टिळक यांचे नाव आघाडीवर आहे, तर गणेश बिडकर, धीरज घाटे यांच्यासह अनेक नेते इच्छुक आहेत. तसेच बापट यांच्या सुनेचे नावही चर्चेत आहे.
COMMENTS