बारामती भाजपकडे, माढा जानकरांकडे ?

बारामती भाजपकडे, माढा जानकरांकडे ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातील उमेदवारीबाबत महायुतीतून भाजप आग्रही राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीऐवजी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली जाणार असल्याचं बोललं जात आहे. मागच्या निवडणुकीमध्ये महायुतीतून बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली होती. परंतू आगामी निवडणुकीत तसं न करता ही जागा भाजप स्वतःकडे घेणार असल्याचं बोललं जात असून महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघ दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. यारुन पुणे जिल्ह्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडेही भाजपनं आता लक्ष घातलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपही आतापासूनच लोकसभेच्या तयारीला लागलं असल्याचं दिसत आहे. बारामतीमधून मागील निवडणुकीत रासपचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुळे यांचं मताधिक्यही घसरलं होतं. परंतु मंत्रिपद मिळाल्यानंतर जानकर यांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप स्वतःकडे घेणार असल्याची चर्चा असून या मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS