भाजपला धक्का बसण्याची शक्यता, हे महत्त्वाचे उमेदवारच पिछाडीवर !

भाजपला धक्का बसण्याची शक्यता, हे महत्त्वाचे उमेदवारच पिछाडीवर !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीदरम्यान शिवसेना-भाजप आघाडीवर आहे. परंतु भाजपचे काही महत्त्वाचे नेतेच पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
मतदानाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत रंगदार ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यात लढत होत आहे. या लढतीत पंकजा मुंडे या पिछाडीवर असून 13 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे हे 24247 मतांनी आघाडीवर आहेत.

तसेच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपाच्या अतुल सावे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सावे यांच्या मतदारसंघात एमआयएम उमेदवार गफार कादरी हे आघाडीवर आहेत.

कर्जत जामखेडमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांची जागाही धोक्यात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे याठिकाणी राम शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दुसरीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष स्वीकारत भाजपाने मुख्यमंत्र्याचे पीए अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बसवराज पाटील हे निवडणूक लढवत असून, त्यांनी पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अभिमन्यू पवार यांची जागाही धोक्यात असल्याचे दिसत आहे.

तसेच भाजपासाठी महत्त्वाची लढत असलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे हे तब्बल 18 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेत तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे इथेही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं दिसत आहे.

COMMENTS