फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करू नका – चंद्रकांत पाटील

फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करू नका – चंद्रकांत पाटील

पुणे : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावर आज प्रदेशाध्यक्ष पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात दुफळी नाही. दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचं रेणू शर्मा या विषयावर एकमत आहे”, असंदेखील ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांचा कबुलीजबाब गंभीर आहे. याच कबुलीजबाबावरुन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: आरोप गंभीर असून आरोपांची दखल घेतली जाईल, असं म्हणाले होते. शरद पवार अशा प्रकारच्या प्रकरणात कडक धोरण स्वीकारतात. त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कुणालाच पाठिशी घातलं नाही. मात्र, काल त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“शरद पवारांकडून नैतिकतेची चाड अपेक्षित आहे. भारतीय राजकारणात अशा घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. राजीनामा दिला नाही म्हणून भाजप महिला मोर्चा सोमवारपासून (18 जानेवारी) जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देणार”, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS