नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकार गडगडलं असून या सरकारचा भाजपनं पाठिंबा काढून घेतला आहे. भाजपकडून पाठिंबा काढल्याचे पत्र पाठवले जाणार असून आज संध्याकाळी महबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीत जे हेतू होते ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत भाजपनं हा पाठिंबा काढल्याची माहिती आहे. भाजप नेते आणि जम्मू काश्मीरचे भाजप प्रभारी राम माधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव होता. तसेच मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही आमच्या बाजूने योग्यरित्या सरकार चालवण्याचा प्रयत्न करत होतो. राज्याच्या तीन प्रमुख भागांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सध्या राज्यात जी परिस्थिती आहे, त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराचं प्रमाण अधिक असून फुटीरतावाद वाढला आहे. नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असल्यामुळे पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
दरम्यान जम्मू काश्मीरमधील पीडीपी आणि भाजप ही देशद्रोही युती होती. युती तुटल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
COMMENTS