मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने भाजपने आक्रमक भूमिका घेत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी निर्धार केला. त्याचवेळी शिवसेनेने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून काॅंग्रेसमधून २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला नेता मागील काही वर्षांपासून अडगळीस पडला होता. त्याने आज मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
अनेक वर्षांपासून शिवसेनेचं मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. २०१७ च्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती. मात्र, राज्यातील राजकीय समीरकरणांमुळं भाजपनं महापालिकेत शिवसेनेला दुखावले नव्हते. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपची युती तोडून सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यामुळं राजकीय समीकरणं पुरती बदलली आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून वॉर्डावॉर्डातील तटबंदी भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं यात आघाडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाचा मोहरा गळाला लावला आहे. माजी नगरसेवक व मुंबई भाजपचे सचिव समीर देसाई यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. समीर देसाई हे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत कामत यांचे भाचे आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा महापालिकेत काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं आहे. गोरेगावमधून ते नगरसेवक होते. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते दहा वर्षे सदस्य होते.
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देसाई यांना भाजपमध्ये आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. मात्र, पक्ष प्रवेशानंतर ते राजकीयदृष्ट्या अडगळीत होते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. शिवसेनेत त्यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
COMMENTS