बीड : बीड जिल्हात मागील काही वर्षांपासून मुंडे कुटुंबियात संघर्ष पाहावयास मिळत आहे. मात्र, वर्षभऱापासून दोन्ही भावा-बहिणींमध्ये जवळीक निर्माण झाली असून दोघांमधील अबोला कमी झाला आहे. दोघे कोणत्या-ना कोणत्या निमित्ताने एकत्र येत असल्याचे पाहवयास मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होत असताना परळीमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे मुंडे भाऊ-बहिणीमध्ये मनोमिलन झाले आहे का अशी चर्चा राज्यभर निर्माण झाली आहे.
परळीत कट्टर राजकीय विरोधक म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राज्यातील राजकारणात परिचित आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत तर दोघांमधील संघर्ष विकोपाला गेला होता. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर दोघांमध्ये काही दिवस अबोला होता. मात्र, दसऱ्या मेळाव्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ऊसतोड मजूरांचा प्रश्न असो कोरोनाचा आजारानिमित्त दोघांमध्ये संवाद सुरू आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजकीय कडवटपणा चालेल पण घरात सुसंवाद हवा, असं सूचक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला धरुन आज पंचायत समिती ठरावावर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे बहिण भावंडातील राजकीय कडवटपणा दूर होतोय की काय अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.
परळी पंचायत समिती सदस्यांनी सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुशंगाने आज परळी तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पंचायत समिती 11 पैकी 10 सदस्य हजर होते तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उभे करुन मतदान केल्याने सभापतीविरोधात ठराव मंजूर झाला आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तहसील व शहरात मोठा पोलिस फाटा तैनात होता.
COMMENTS