नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. सत्तेवर असणा-या भाजपकडूनही देशभरात आपली फळी मजबूत करण्यासाठी जोरदार प्रचार केले जात आहेत. पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या जोडगोळीकडून आगामी निवडणुकीसाठी मास्टर प्लान आखला जात आहे. परंतु अशातच भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचं दिसत आहे. पक्षांतर्गत धुसफुसीमुळे थेट अमित शाह यांच्या अधिकाराला आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी ओम प्रकाश माथूर हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील नेत्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या एकाही कार्यक्रमाला उपस्थिती लावत नसल्याचं आढळून आलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी वाराणसी येथे घेतलेल्या बैठकीला ओम प्रकाश माथूर यांनी दांडी मारली होती. त्यामुळे यावरुन त्यांची भाजपवर असलेली नाराजी उघडपणे दिसत आहे. भाजपाचे संघटन मंत्री सुनील बन्सल यांची कार्यपद्धती माथूर यांना फारशी पसंत नाही. प्रभारी असूनही अनेक निर्णय त्यांच्या संमतीविना घेतले जातात. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून माथूर यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना उनुपस्थित राहणे पसंद केले आहे.
ओम प्रकाश माथूर आणि पंतप्रधान मोदी
दरम्यान ओम प्रकाश माथूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्याकडे सध्या भाजपाचे उपाध्यक्षपद असून ते उत्तर प्रदेशचे प्रभारीही आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या काही निर्णयावर ते प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा विरोधकांना फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माथूर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता अमित शाह आणि पंतप्रधान मोदी काय करतात हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS