भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न, चार ते पाच आमदारांशी संपर्क, जेडीएसचा दावा !

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न, चार ते पाच आमदारांशी संपर्क, जेडीएसचा दावा !

बंगळुरु – कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस-जेडीएस सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात असतानाच भाजपनं मात्र वेगळी रणनिती खेळण्यास सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. कारण भाजपकडून जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असून आतापर्यंत चार ते पाच आमदारांशी संपर्क साधला असल्याचा दावा  जेडीएसनं केला आहे.

दरम्यान फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये 100 रुम बूक केल्या असल्याची माहिती आहे. तसेच या रुममध्ये काँग्रेसच्या आमदारांना ठेवलं जाणार आहे.यावरुन भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्यावेळी जी राज्यसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळीही याच रिसॉर्टमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं होतं. कर्नाटकात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे.

भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार

कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे परंतु भाजपकडे बहुमतासाठी 8 जागांची कमी आहे. त्यामुळे भाजपला फोडाफोडी करण्यात यश येणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

एकूण 222

COMMENTS