अहमदनगर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून अनेक धक्कादायक निकाल पुढं येत आहेत. नगरमध्ये भाजपचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व प्रा. राम शिंदे या दोन दिग्गज नेत्यांना त्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी १७ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. विखे यांच्या पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. मात्र, शेजारच्या लोणी खुर्द गावातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या गावात मागील २० वर्षांपासून विखेंची सत्ता होती. यावेळी विखेंना सत्ता गमवावी लागली आहे. विखेचे विरोधक असलेल्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं विखेंना धक्का दिला आहे. राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात मात्र विखेंना आधीच यश आलं आहे.
तर नगरमधील भाजपचे दुसरे नेते व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या चौंडी गावची सत्ता भाजपकडून खेचून आणली आहे.
COMMENTS