मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला झालेले एक वर्षे, विधानपरिषद निवडणुकीतील अपयश, महापालिका निवडणुका आणि महाविकास आघाडीवरील जनतेचा वाढता विश्वास याची कारणमिंमसा दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित होते. सुमारे तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे काल दिल्लीला गेले होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, शिवप्रकाश, व्ही, सतीश आणि विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.
या बैठकीमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याशिवाय विधानपरिषदेतील पराभवाची कारणंही नड्ड यांनी जाणून घेतली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची तयारी, महाराष्ट्रातील आगामी पाच महापालिका निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. तसेच कृषी कायद्यांबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची असलेली भूमिका, या कायद्याच्या समर्थनासाठी केलेल्या कार्यक्रमांची माहितीही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
COMMENTS