अहमदनगर – भाजपच्या महिला पदाधिकाय्रानं राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात लिहिलेल्या पत्राची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांची तक्रार करणारे पत्र सुनिता शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लिहिलं आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सुनिता शिंदे या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार आहेत.
दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे आहे असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी केली होती. या टीकेवरुन सुनिता शिंदे यांनी हे पत्र लिहिलं आहे. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने मला उमेदवारी दिली आहे. तर प्रचारात आमदार राहुल जगताप यांनी वरील विधान करुन महिलावर्गाचा अपमान केला असल्याचं सुनिता शिंदे यांनी म्हटलं आहे.
आमदार राहुल जगताप यांना समज द्या. त्यांनी केलेले विधान हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खटकणारे आहे.महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि महिलांचा मान-सन्मान वाढवण्यासाठी पवार साहेबांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. त्यामुळे आपल्या आमदाराला समज देण्याची गरज असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS