कल्याण – कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या भूमिकेमुळे पक्षाला त्रास होऊ नये यासाठी राजीनामा दिल्याची पवार यांनी माहिती दिली आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर याबाबत पोस्ट शेअर करत ही राजीनाम्याची माहिती दिली आहे.
नरेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट
नमस्कार,
आज खूप जड अंतकरणाने एक कटू निर्णय मला घ्यावा लागतोय. महायुतीने विधानसभा जागा वाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरून व्यतिथ होऊन मी दि. ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही (DOTXN37209009991549896436) राजीनामा देत आहे.
खरंतर, मी असा साधा विचारही कधी मनात आणला नव्हता की, अशाप्रकारे मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो मलाही कल्पना नाही. २०१४ साली युती नसताना भाजपाच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि मी जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केले. निवडून आल्यानंतर मी प्रामाणिकपणे माझ्या मतदार बंधु – भगिनींची सेवा केली. पक्षाची सेवा केली. माझ्या पक्षाला शेवटच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी अविरतपणे काम केले मात्र आता विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा घटकपक्षाला सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने मला घडवलं, वाढवलं आणि माझ्यातला जनसेवक जागृत ठेऊन सेवा करण्याची प्रेरणा दिली त्या पक्षाला माझ्यामुळे कोणतीही अडचण नये अशी माझी भूमिका आहे. काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात. आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे. काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.
आपला
श्री. नरेंद्र बाबुराव पवार
अपक्ष उमेदवार, 138 – कल्याण पश्चिम विधानसभा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2397293590325072&id=549959288391854
COMMENTS