भाजपचे ‘हे’ दोन बडे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

भाजपचे ‘हे’ दोन बडे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. भाजप नेते वसंत गीते भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
गीते हे नाशिक मध्य मधून काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गीते समर्थक आणि काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांची काल भुजबळ यांच्यासोबत आज बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती समोर आली आहे. कोकाटे यांनी गेल्या विधानसभेला भाजपात प्रवेश केला होता. परंतु भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार आहेत. यावेळेस विधानसभा निवडणूक ते सिन्नरमधून लढणार असल्याची माहिती आहे.

कोकाटे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात युवक काँग्रेसपासून केली होती. ते  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. त्यानंतर काँग्रेसमध्येही त्यांनी पूर्णवेळ काम करून पक्ष संघटन केले. दरम्यान, शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला तेव्हा कोकाटे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.
त्यानंतर कोकाटेंनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेत आमदार म्हणून ते विधानसभेत सलग तीन वेळा विजयी झाले. परंतु नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर कोकाटेही काँग्रेसवासी झाले होते. त्यांनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ साली त्यांनी भाजपकडून आमदारकी लढवली. मात्र, शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत शिवसेनेशी भाजपची युती असल्यामुळे कोकाटे यांनी शक्तीप्रदर्शन करून बंडखोरी करत अपक्ष खासदारकी लढवली. मात्र, त्यांचा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी पराभव केला. त्यानंतर ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS