मुंबई – राज्यात भाजपला मोठा राजकीय धक्का बसणार असून भाजपचा नेता उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आज अपूर्व हिरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी उद्या (ता.15) आपल्या निवडक सहकारी व समर्थकांची बैठक नाशिक शहरात आयोजित केली आहे. या बैठकीनंतर ते राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाविषयी घोषणा कणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेषतः जिल्हा बॅंकेशी संबंधीत अनेक अडचणी आहेत. त्यात शासनाने मदत करावी अशी मागणी हिरे यांनी केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघ तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हिरे कुटुंबीय इच्छुक उमेदवार आहेत.परंतु भाजपकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यानंतर आता ते थेट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
COMMENTS