सातारा, कुडाळ – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपने दिलेल्या वागणुकीला कंटाळून कुडाळ येथील भाजपचे नेते दीपक पवार हे राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना भाजपने गळाला लावल्यामुळे गेली पाच वर्षे भाजपसाठी झटणाऱ्या दीपक पवार यांच्या कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यातूनच साताऱ्यात आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. हे राजकीय समीकरण झाल्यास सातारा विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजे व दीपक पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेतल्यानंतरही त्यांनी पक्षात राहून उमेदवारीचा हक्क डावलला जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी बूथ प्रमुखांचा मेळावा घेतला. जावळीतील भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली; परंतु पाच वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाची दखल वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतली गेली नाही.
महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न दीपक पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात भाजपकडून झालेल्या अन्यायाबाबत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. राजकीय अस्तित्वाबरोबरच सर्वसामान्यांचे नेतृत्व, राजकारणातील स्थान टिकवण्यासाठी दीपक पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली त्यामुळे ते आता राष्ट्रवादीत जातील हे निश्चित झालं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS