नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली. देशातील 7 राज्यात 51 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं . ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या टप्प्यात मतदान घेण्यात आलं आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.
हा टप्पा भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण 2014च्या निवडणुकीत या 51 जागांपैकी 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या. परंतु या निवडणुकीत मात्र विरोधकांचं मोठं आव्हान असल्यामुळे आणि मोदी लाट ओसरल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अवघड मानली जात आहे.
दरम्यान राजस्थानमध्ये 2014च्या निवडणुकीत सर्वच म्हणजे 12 जागा भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या. तर उत्तर प्रदेशमधील 14 जागांपैकी 12 जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसनं जिंकलेल्या दोन जागा होत्या रायबरेली आणि अमेठी. परंतु या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची युती झाली आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपसाठी ही निवडणूक तितकी सोपी नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS