नवी दिल्ली – पक्षविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे आणि सतत स्वतःच्या पक्षावर टीका केल्यामुळे आता भाजप खासदाराची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आतापर्यंत अनेकदा स्वत:च्या पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या निर्णयांवरही त्यांनी अनेकवेळा टीका केली आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच्या भेटीगाठीमुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी रात्री राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. ‘राजद’च्या या इफ्तार पार्टीला लालूंची कन्या मिसा भारती यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. आम्ही शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी द्यायला तयार असल्याचे मिसा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्षातील त्यांच्याविरुद्धचा रोष आणखी वाढला असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हांचे आता पक्षात थोडेच दिवस शिल्लक राहिले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सिन्हा यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS