पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गटबाजी समोर आली आहे. काल सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री विजय देशमुख गटाने ‘दांडी’ मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजी समोर आली आहे. पंढरपूर येथे या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपची महत्वाची बैठक झाली.
या बैठकीकडे पक्षाच्या महासचिव सरोज पांडे यांनीही पाठ फिरवल्याने पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. तसंच या बैठकीला जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. मात्र, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे आणि सुरजित ठाकूर यांच्याशिवाय कोणताच मोठा नेता फिरकला नाही.
दरम्यान माढामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोलापूरमधून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठ आव्हान उभं राहिलं आहे. त्यात पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळं कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या सर्व प्रकारामुळे सहकार मंत्र्यांनी थेट पालकमंत्री गटातील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
भाजपमध्ये आलेल्या ‘पवारप्रेमींना’ जर त्यांचा प्रचार करायचा असेल, तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे लागतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये फूट पडली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS