नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत निवडणूक रणनितीबाबत चर्चा क्ली जाणार आहे. बैठकीत महाराष्ट्राच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे. भाजपाच्या पहिल्या यादीवर, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्य वर्तवण्यात आहे. तसेच बैठकीत शिवसेनेसोबत युती संदर्भात, जागा वाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे मुंबईतून रवाना झाले आहेत.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना -भाजपची युती होणार असल्याची चर्चा आहे. जागावाटपाबाबत शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे. 11 पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला आहे. परंतु अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेलं नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पाच जागांवरुन आता युतीचे घोडे अडले असल्याचं दिसत आहे.
दरम्यान या पाच जागांमध्ये वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) औसा (लातूर) या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे या जागांचा तिढा लवकरच सोडवतील असं बोललं जात आहे. तसेच युतीची 29 तारखेपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे 29 तारखेनंतर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS